Thursday 1 June 2023

पुस्तक परीक्षण - राष्ट्रपती - पंतप्रधान - वाद-संवाद

 

राष्ट्रपती - पंतप्रधान - वाद-संवाद

                                                                                - अनिल शिंदे


माझ्या पत्रकार मित्राने लिहिलेले, ' राष्ट्रपती - पंतप्रधान - वाद-संवाद हे पुस्तक नुकतेच मी वाचले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत, जेव्हा 'राज्यपाल-मुख्यमंत्री" असे वाद अनेक राज्यांत होत असताना, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संवाद कसा असतो याबद्दल मनात कुतूहल होते.

अगदी खरे सांगायचे तर, आजपर्यंत मी ही आपल्या देशातील या दोन महत्त्वाच्या पदांसंदर्भात फारसा तपशिलात विचार केला नव्हता. या दोन सर्वोच्च संविधानिक पदांमधील सबंध कसे असायला हवेत, आणि आतापर्यंत ते कसे होते याबद्दल मला माहिती नव्हती. मात्र स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना हा महत्त्वाचा लेखाजोखा आहे हे निश्चित.

सध्याच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू या १५ व्या राष्ट्रपती आहेत तर, माननीय नरेंद्र मोदी हे १८ वे पंतप्रधान आहेत. लेखकाने ह्या पुस्तकात राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्या दोघांच्याही कारकिर्दीत, एकमेकांशी असलेल्या संबंधांचे विश्लेषण केले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 'राष्ट्रपती - पंतप्रधान - गाजलेले वाद' या नावाने १९९१ मध्ये प्रसिद्ध झाली होती. पुस्तकाची रचना साधारणपणे अशी आहे की, प्रत्येक राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्या जोडीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

उदा. - डॉ. राजेन्द्रप्रसाद - पंडित नेहरू,

डॉ.राधाकृष्णन - पंडित नेहरू,

डॉ.राधाकृष्णन - लाल बहादूर शास्त्री, ..

या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. या मुळे प्रत्येक राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील कार्यकाळाचे, संबंधांचे निरीक्षण झाले आहे असे दिसते.

आपले पहिले पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघेही स्वातंत्र्य चळवळीतून आलेले असल्याने त्यांच्यात मतभेद नसतील असे मला वाटले होते. पण तसे प्रत्यक्षात नव्हते. पंडित नेहरूंचा भारतात उच्च शिक्षण घेतलेल्या, हिंदू धर्माला मानणाऱ्या ह्या राष्ट्रपतींवर तेवढा विश्वास नव्हता असे दिसते. राष्ट्रपतींच्या विदेश दौऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी यावी लागते. पंडितजींनी मुद्दामून राजेंद्र प्रसाद यांना परदेश दौऱ्यांपासून दूर ठेवले. १७ वर्षे परराष्ट्र खातेही स्वतःकडेच ठेवणाऱ्या नेहरूंना बहुतेक या बाबतीत इतरांना कळत नाही असे वाटत असावे. डॉ. राजेंद्रप्रसाद सनातनी आहेत, ते धर्मनिरपेक्ष भारताची भूमिका जगात योग्यपणे मांडू शकणार नाहीत असेही त्यांना वाटत असावे. डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या मृत्युनंतरही, 'त्यांच्या अंत्ययात्रेला जायची गरज नाही,' असे त्यांनी डॉ.राधाकृष्णन यांना कळवले होते. अर्थात डॉ.राधाकृष्णन यांनी ते ऐकले नाही हे ही तितकेच खरे.

सर्व पुस्तक वाचल्यानंतर जाणवले की, साधारणपणे सर्व पंतप्रधानांचे माननीय राष्ट्रपतींशी एकंदर सौहार्दाचे संबंध होते. थोडा मनमुटाव असेल, पण ह्या दोघांत तीव्र मतभेद नव्हते. अपवाद फक्त पंडित नेहरू आणि राजीव गांधी यांचा. इंदिरा गांधींच्या काळात राष्ट्रपती जवळ जवळ रबर स्टॅम्प होते असे म्हटले तरी हरकत नाही.

पंडित नेहरू आणि राजीव गांधी या दोन्ही पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या विरोधात निर्णय घेतले. त्यांच्या अधिकारांना डावलण्याची भूमिका नेहरूंनी घातली, तर झैलसिंग आणि राजीव गांधी या दुकलीचा कार्यकाल वादग्रस्त ठरला. ग्यानी झैलसिंग १९८२च्या जुलैमध्ये राष्ट्रपती झाले, तर राजीव गांधी १९८५ साली जानेवारीत प्रचंड बहुमत मिळवून पंतप्रधान झाले. पंडित नेहरूंप्रमाणे राजबिंडे असलेल्या राजीव गांधी यांची जनमानसातील प्रतिमा 'साधा, सरळ, सज्जन माणूस ' अशी होती. पण राजीव गांधी यांनी ग्यानीजींना योग्य त्या सन्मानाने वागवले नाही, असे पुस्तकातील माहितीवरून वाटते. राष्ट्रपतींनी गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

याकाळात राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांत कमालीचा विसंवाद होता. ग्यानीजींचे कोणतेही परदेश दौरे या काळात पंतप्रधान कार्यालयातून मंजूर केले गेले नाहीत. महत्त्वाच्या बाबींसंदर्भात राष्ट्रपतींना माहितीही दिली जात नव्हती. पंतप्रधानांचा हा व्यवहार पाहून काँग्रेस शासन असलेल्या राज्यातील मुख्यमंत्रीही राष्ट्रपतींना पुरेसे महत्व देत नव्हती. ह्या कार्यकालाबद्दल विस्तृत माहिती पुस्तकात आहे. संतापलेल्या ग्यानीजीं यांनीही मग सरकारला धक्के द्यायला सुरवात केली. राजीव गांधी यांनी आणलेले 'टपाल विधेयक' त्यांनी मंजूर केले नाही हे महत्त्वाचे. मोदीजींना हुकुमशहा म्हणणाऱ्या लोकांना ह्या टपाल विधेयकाची माहिती नसावी. १९८५ ते ग्यानीजीं यांचा कार्यकाल संपेपर्यंत हे घमासान चालूच राहिले.

नंतरचे राष्ट्रपती आर.वेंकटरमण हे राजीवजींच्या मर्जीतले असले तरीही त्यांनी आपल्या पदाची शान राखली. नंतरच्या काळात राष्ट्रपती असलेल्या के.आर.नारायणन यांनीही अनेक वादग्रस्त प्रश्नांसंदर्भात ज्येष्ठ सल्लागारांशी सल्ला मसलत करूनच योग्य ते निर्णय घेतले. पंतप्रधान आपल्या राजकीय वजनाचा, पक्षाच्या लोकप्रियतेचा वापर करून आपल्या मर्जीतला राष्ट्रपती नेमतात हे उघड आहे. इंदिरांजीच्या काळात हे सर्रास घडले. १९८९ ते २००० च्या दशकात मिलीजुली सरकारे सत्तेत येत होती. त्याकाळातही राष्ट्रपती नेमणुकीत कॉंग्रेसचा सहभाग महत्त्वाचा होताच. कारण ही सरकारे काँग्रेसच्याच पाठींब्याने सत्तेत येत होती. ह्या काळात कॉंग्रेसचा पंतप्रधान नव्हता. पण ह्या सर्व कॉंग्रेसेतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचा, त्यांच्या पदाचा, अधिकाराचा सन्मान केला असे दिसते.

एकंदरीत १९४७ ते २०१४ ह्या कालखंडात प्रामुख्याने काँग्रेसचे वर्चस्व ह्या निवडीत होते. अपवाद फक्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांचा. त्यांच्या रूपाने एक सामान्य माणूस, वैज्ञानिक ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. भाजपने सुचवलेल्या ह्या नावाला पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कॉंग्रेसनेही संमती दिली होती हे विशेष.

पंडित नेहरू यांचा साधारणपणे १७  वर्षांचा कार्यकाल, इंदिरा गांधी यांचा अंदाजे १६ वर्षांचा कार्यकाल आणि राजीव गांधी यांचा अंदाजे ५ वर्षांचा कार्यकाल  अशी ३८ वर्षे भारतावर नेहरू घराण्याने सत्ता गाजविली. लाल बहादूर शास्त्री (दीड वर्षे) , पी,व्ही. नरसिंह राव (५ वर्षे), मनमोहन सिंग (१० वर्षे) आणि काँग्रेस प्रणीत सरकारे धरता एकूण ६० वर्षे भारतीय संसदीय व्यवस्था काँग्रेसच्या हातात होती असे म्हणायला हरकत नाही. अपवाद फक्त ५ वर्षे वाजपेयी सरकार आणि आताचे मोदी सरकार यांचा. म्हणजे जेमतेम १५ वर्षांचा.

असे असूनही प्रामुख्याने पंडितजी, इंदिराजी, राजीवजी पंतप्रधान असताना, त्यांच्याच कार्यकाळात राष्ट्रपतींच्या पदाचा योग्य तो सन्मान राखला गेला नाही हे जाणवते. मात्र काँग्रेस मधीलच इतर नेते पंतप्रधान पदी असताना त्यांनी असा राष्ट्रपतींचा अवमान केला नाही.

परवा नव्या संसदेच्या लोकार्पण समारंभावेळी 'राष्ट्रपतींना डावलले' असे गळे काढणाऱ्या काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी हा इतिहास सोयीस्करपणे विसरल्याचा आविर्भाव आणला होता. असो.

लेखकाने हे पुस्तक अतिशय निष्पक्ष वृत्तीने लिहिले आहे हे जाणवते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठी काही पुस्तके सुचवत असतील, तर या पुस्तकाचा समावेश अत्यावश्यक आहे. राजकारणातील बारीक सारीक तपशीलांसह लेखकाने प्रत्येक राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्या काळाची नोंद केली आहे.

राजकारणात रस असलेल्या व अभ्यासासाठी वाचणार्या व्यक्तीला हे पुस्तक आवडेल यात शंकाच नाही. पण यातील भाषा थोडी कोरडी, रुक्ष वाटते. हा इतिहास असला तरीही तो रंजकतेने सांगितला तर सामान्य वाचकालाही आवडेल. नुकताच बरखा दत्त आणि के.सी.सिंग यांचा ह्याच विषयावरील एक संवाद मी you tube वर पाहिला.

 

(Barkha Dutt LIVE | Rashtrapati Bhawan Vs Rajiv Gandhi, Inside the Zail Singh Presidency | KC Singh)

 

ही मुलाखत फारच माहितीपूर्ण आहे. असेही references जर पुस्तकात दिले तर वाचकांना अधिक माहिती मिळेल.

त्याचप्रमाणे असेही आवर्जून सांगावेसे वाटते की, कालानुरूप ह्या वाद-संवादाच्या अनेक आवृत्त्या निघत राहाव्यात. जसे १९९१ मध्ये निघालेल्या आवृत्तीत १९९० पर्यंतचा कालखंड आहे. तर २०१८ मध्ये निघालेल्या आवृत्तीत मोदी -प्रणव मुखर्जी, मोदी - रामनाथ कोविंद   या जोडीपर्यंत लेखक येऊन पोचला आहे. याप्रमाणे दर २०/२५ वर्षांनी हा लेखाजोखा घेणे आवश्यक आहे. भारताच्या संसदीय राजकारणाची दिशा जाणून घेण्यासाठी हा उपक्रम अत्यावश्यक आहे.

स्नेहा केतकर

Wednesday 19 January 2022

मन 'रोम' रंगी रंगले

 

इटली देशांत जेव्हा आपण जातो, तेव्हाच हा एक छोटा देश नाही तर ह्या देशाला मोठा इतिहास आहे हे जाणवते. प्राचीन रोमन साम्राज्याची पायाभरणी इथूनच झाली याच्या खुणा इथे पदोपदी दिसतात. त्या काळात रोमन साम्राज्य जवळजवळ पूर्ण युरोपभर पसरले होते. ख्रिस्ती धर्माचा प्रसार इथूनच साऱ्या युरोपात झाला. म्हणूनच इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकाला ह्या देशाला भेट देणे अत्यावश्यक आहे असे वाटते.

सर्वात प्रथम रोम शहरालाच भेट दिली. अतिशय देखणे आहे हे शहर!!!

रोम शहरात जवळ जवळ दीड हजार कारंजी आहेत. एकेकाळी ह्या कारंज्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा सगळ्यांना. त्या काळातील लोकांपर्यंत पाणी पोचवण्याचे त्यांचे हे ज्ञान वाखाणण्याजोगेच म्हणायला हवे. आजही ती सगळी कारंजी आहेतच. पण त्यांचे पाणी पिण्याजोगे नसते. ते रिसायकल केलेले असते. मात्र शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे नळ आहेत आणि त्यातले पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता.

रोममधील भव्य इमारत म्हणजे "कोलोझियम"!! सगळया जगाला ग्लॅडिएटर सिनेमामुळे माहिती असलेली!! हजारो माणसे येथे बसून खेळ, युद्धे बघत असत. याच ठिकाणी जिंकलेल्या युद्धाचे नाट्यमय सादरीकरण होत असे. कैदेत असलेल्या गुन्हेगारांकडून ही युद्धे खेळविली जात असत. पुरूषच नव्हे, तर बायकाही या क्रूर खेळांचा आनंद घेत असत. जमावाला खिळवून ठेवण्याची किमया या ठिकाणी साधली जात होती. आणि राज्यकर्त्यांना हेच हवे होते. युद्धे, स्पर्धा यांकडे तेव्हाही मानव आकर्षित होत होता. पण कोलोझियम मध्ये क्रौर्याची परिसीमा गाठली जात असे आणि याला कोणाचाही त्या काळात विरोध नव्हता. दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत आज जागतिक ठेवा आहे.

युद्ध म्हटले की हार-जीत आली. जित आणि जेते आले. आणि मग जिंकलेल्यांनी आपले वर्चस्व स्थापन करणे हे ओघाने आलेच. काही वर्षांपूर्वी इस्तम्बूलला गेले असताना तिथे 'आया सोफिया' नावाचे प्रसिद्ध चर्च पाहिले होते. चौदाशे वर्षांपूर्वी ते बांधले होते. तेव्हा इस्तम्बूल हे कॉन्स्टन्टिनोपल होते. रोमन राजा कॅान्स्टन्टाईनने ते जिंकले होते. ऑटोमन साम्राज्यात 'आया सोफिया' चे मशिदीत रुपांतर करण्यात आले. काही काळ ही वास्तू संग्रहालय - म्युझियम म्हणून प्रसिद्ध होती. आता परत एर्दोगान यांनी नुकतेच 'आया सोफिया'चे मशिदीत रुपांतर केले आहे.




तसेच रोममध्ये 'पॅन्थिऑन' नावाचे प्राचीन देऊळ आहे. इसविसन पूर्व २७ ते ३५ या दरम्यान हे देऊळ बांधले होते. प्राचीन काळी 'पॅगनिझम' या पंथाचा प्रभाव होता. निसर्गालाच देव मानणारा हा पंथ असे याचे थोडक्यात वर्णन करता येईल. या देवळात मूर्तीपूजा ही होत असे अशा इतिहासात नोंदी आहेत. आता याच 'पॅन्थिऑन'चे चर्च झाले आहे. रोम शहरामध्ये अनेक प्राचीन देवळे आहेत. ज्या देवळांवर क्रॉस उभारला गेला, ती वाचली/टिकली. बाकीची मात्र नष्ट झाली. सम्राट कॅान्स्टन्टाईनने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने साऱ्या देशाचा हाच धर्म झाला. ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मपीठ व्हॅटिकन ही येथेच आहे. इथुनच ख्रिश्चन धर्म युरोपात पसरला असे म्हणायला हरकत नाही.

रोम शहर हे मला आपल्या दिल्लीसारखे वाटले. इतिहासाच्या खुणा जागोजाग दिसतात येथे. अर्थात दिल्लीच्या मानाने रोम हे लहान शहर आहे. रोमची लोकसंख्या २७ लाख आहे. याठिकाणी फिरताना भारत व इटली /रोम यातील अनेक संबंध सहजच आठवत होते. सोनिया आणि राहुल गांधींची आठवण येणे स्वाभाविक होते. सावरकरांची ही आठवण आली. जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. मॅझिनीचा प्रभाव फक्त सावरकरांवर नव्हे, तर भारत व जगातील अनेक नेत्यांवर होता. भारत शोधता शोधता अमेरिकेला पोचलेला कोलंबस इथलाच. इटलीतील जेनोआ गावाचा. आणि शेकस्पिअरच्या अनेक कथात /नाटकात इटली आहेच. 'दी मर्चंट ऑफ व्हेनिस' मधील 'शायलॉक' आठवतोय ना? 'ऑथेल्लो' नाटकातही पार्श्वभूमी व्हेनिसचीच आहे. रोमिओ -ज्यूलियेट आठवतायत का? हे नाटकही एका रोमन कथेवर आधारित आहे. ही प्रेमकथा घडते 'वेरोना' या इटलीतील गावी.

इतिहासकार व व्यापारी मार्कोपोलो, गॅलिलीओ, मायकेल अँजेलो या विचारवंत, कलाकारांनी इटलीच नव्हे तर जगालाही समृद्ध केले आहे. नुसतेच इतिहासात नाही तर आपल्या भाषेतही अनेक वाक्प्रचार या देशाशी/शहराशी निगडीत आहेत. उदाहरण द्यायचे तर, 'Rome was not built in a day' किंवा " When in Rome, do as Roman's do.", किंवा 'All roads lead to Rome" ह्या सगळया म्हणी त्या काळातील रोमचे, इटलीचे महत्वच सांगतात. रोम जळत असताना फिडल वाजवणारा नीरो इथलाच. नीरो हा जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला. पण एका उन्मत्त राजसत्तेचे प्रतीक म्हणून आजही तो आठवला जातो.

एकेकाळी रोम हे फक्त इटलीचेच नव्हे तर युरोपचेही सत्ताकेंद्र होते. फक्त रोम नव्हे, तर व्हेनिस ही व्यापारात अत्यंत महत्वाचे केंद्र होते. आशिया खंडाला जवळचे असल्याने युरोपचा सारा व्यापार व्हेनिस मार्गे चालायचा. एकेकाळी राजसत्तेएवढीच धर्मसत्ताही इथे प्रभावी होती. येथील वैभवशाली चर्चेस पाहून हे लक्षात येते. पण इथली चर्चेस, आपल्या देशांत दिसणाऱ्या चर्चेसपेक्षा वेगळी दिसतात. इथल्या चर्चला गोल घुमट आहे. आणि प्रत्येक चर्च शेजारी एक मनोराही आहे. पिसाचा मनोरा हा असाच चर्चच्या प्रांगणात आहे. मशिद आणि मीनारासारखेच इथे चर्च व त्याचा मनोरा दिसतात. इस्लाम व ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचा उगम जवळ जवळ एकाच स्थानी झाला आहे. या दोन्ही धर्मांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि प्रसारासाठी एकमेकांशी असंख्य धर्मयुद्धे केली. त्यामुळे या दोन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थलांमधील साम्याने मात्र आश्चर्य वाटते.

सुब्रमण्यम स्वामींचीही यासंदर्भात आठवण होते. आपापल्या धर्मविस्तारासाठी इस्लाम व ख्रिस्ती धर्मानी आधीच्या धर्मांचे, पंथांचे अस्तित्वच कसे पुसून टाकले हे पटते. शांती आणि दयेचा वारसा सांगणारे हेच ते धर्म का असा प्रश्न आपल्याला पडतो.

इटली देश हा कलेच्या क्षेत्रातही अग्रेसर होता. युरोपातील पुनर्निर्मिती व प्रबोधन काळाची वाटचाल या देशातून झाली. लिओनार्दो-दा-व्हिन्सी, मायकेल अँजेलो, राफेल आणि असे अनेक कलावंत इथलेच. रोमन साम्राज्याची चढती कमान असल्याने सर्व कला या काळात बहरून आल्या इथे. रोम असो, व्हेनिस असो, फ्लॉरेन्स असो किंवा एखाद्या सिएना सारख्या छोट्या गावातले चर्च असो, सर्वकडे अप्रतिम कलेचे दर्शन घडते. फ्लॉरेन्स या शहरात तर इतकी म्युझियम्स आहेत, की ती सगळी नुसती पहायची ठरवली तरी तिथे महिनाभर मुक्काम ठोकावा लागेल.

एक वेगळा अनुभव या देशांत आल्यावर आपल्याला नक्की मिळतो.

- स्नेहा केतकर.


Saturday 1 January 2022

आवरण

 


'आवरण' ही कादंबरी २००७ मध्ये प्रकाशित झाली आणि कन्नड भाषेत या कादंबरीच्या २० हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. मराठी भाषेत ह्या कादंबरीचा अनुवाद २००९ मध्ये प्रकाशित झाला. मराठीतही दहा आवृत्या निघाल्या आहेत आजपर्यंत!!! असं काय आहे ह्या कादंबरीत, की जिचे वाचक दिवसागणिक वाढत आहेत? 

एखादी कपोलकल्पित अशी ही कहाणी नाही. लेखकानेच सांगितल्याप्रमाणे 'विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला आवरण म्हणतात. विस्मरण कुणाचे? कशाचे? का झाले? या सगळया प्रश्नांची उत्तरे आवरण मध्ये मिळतात. आपल्या प्राचीन संस्कृतीचा, इतिहासाचा, जी आपली उज्ज्वल परंपरा आहे, तिचेच विस्मरण आपल्याला झाले? कसे झाले? का झाले

असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात असेही भैरप्पांनी म्हटले आहे. पण असे असत्य बिंबवणाचा अट्टाहास कशासाठी आणि कुणी केला?

कादंबरीची सुरवात रझिया उर्फ लक्ष्मी हिच्या निवेदनाने होते. हंपीवर एक लघुपट - documentary काढायची म्हणून ती आणि तिचा नवरा तिथे आलेले असतात. पण थातुर-मातुर लिहून लघुपटाचे निवेदन तिला लिहिता येत नाही. तिलाच हंपी येथील उद्वस्त शिल्पे, देवाच्या मूर्ती पाहून अनेक प्रश्न पडायला लागतात. तिचे प्रश्न आपल्यालाही पडायला लागतात. आणि मग कादंबरी पुढे जात रहाते. यात अनेक पात्रे येतात. विविध धर्मांची, धर्मांतर केलेली. जसा लक्ष्मीने उर्फ रझियाने धर्म बदलला आहे तसाच. मग ह्या कथानकातून आपल्याच ह्या प्राचीन संस्कृतीची आपल्याला नव्याने ओळख होत जाते.

मुसलमानांनी हिंदुंवर धर्म बदलण्याकरिता केलेले अनन्वित अत्याचार समोर येतात. या अत्याचारांवर आवरण घालणारे प्रोफेसर शास्त्रींसारखे बुद्धीवादी, पुरोगामी विचारवंत येतात. लक्ष्मीच्या वडिलांसारखे ह्या विषयावर सखोल अभ्यास करणारे, संशोधन करणारे अभ्यासकही येतात. शहरी, ग्रामीण, प्राचीन, अर्वाचीन, ऐतिहासिक असे संदर्भही येतच राहतात. डॉ.भैरप्पांनी सांगितलेल्या ह्या कहाणीत आपण गुंगून जातो. टिपू सुलतानाचे धर्मांध रूप समोर येते. कर्नाटकातील कहाणी असल्याने हा संदर्भ येणे अपरिहार्यच होते.  पण ह्या सगळया गोष्टींना अनेक ऐतिहासिक संदर्भ वाचून, तपासून पुढे आणले आहे. ह्या निवेदनाला इतिहासाचा आधार आहे.

वाराणसीचे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. औरंगजेबाने काशी-विश्वेश्वराचे मंदिर कसे उध्वस्त केले ह्या घटनेचे वर्णन आतपर्यंत हलवून टाकते आपल्याला. जणू आपल्यासमोरच घडतेय ती घटना असे वाटते. त्यावरील बुद्धीवाद्यांनी टाकलेले भ्रमाचे आवरणही काढून टाकतात भैरप्पा! आठशे वर्ष मुसलमानांनी व दोनशे वर्ष ब्रिटिशांनी येथे राज्य करूनही हिंदू धर्म संपला नाही, त्यांना तो संपवायला जमला नाही, हे वाचताना प्रसिद्ध कवी इक्बालच्याच ओळी मनात येतात.......

 

यूनान मिस्र रूमा सब मिट गए जहाँ से

अब तक मगर है बाक़ी नाम-ओ-निशाँ हमारा

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी

सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा

 

आपण या अतिशय क्रूर शत्रूंना तोंड कसे दिले? कधी कणखरपणे, तर कधी लपून-छपून हे ही समोर येते. येथली विद्यापीठे, पाठशाला सर्व बेचिराख केल्यावरही आपला धर्म कसा राहिला? ह्याचे उत्तर समोर येते. आश्चर्य म्हणजे संत परंपरेचा अभ्यास करताना हे शिकविले नव्हते आम्हांला कधी. भारतातील संतांची परंपरा, मग महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास असोत, पंजाबातील शीख धर्मगुरू असोत, राजस्थानातील मीराबाई, उत्तरप्रदेशातील तुलसीदास, सूरदास, कबीर, रहीम असोत, ही परंपरा कशी जन्माला आली? का जन्माला आली? जनमानसात कशी रुजली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या कादंबरीत मिळतात.

 

गर्व से कहो हम हिंदु है - हे एक घोषणा वाक्य होते माझ्यासाठी. पण आज त्या मागील अर्थ, हा धर्म टिकवण्याकरिता केलेला संघर्ष सगळे सगळे समोर येते माझ्या.

 

काशीचे गागाभट्ट रायगडावर कां आले, महाराजांना छत्रपती होण्याची गळ कां घातली? ह्यातील दडलेला अर्थ समोर आला आहे. त्याचबरोबर आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील अनेक सोनेरी पानेही समोर उलगडली. छत्रपती शिवाजी महाराज असोत, बाजीराव पेशवे असोत की आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई असोत, ह्या मराठ्यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका काशीतही फडकत ठेवली हे समजते. आजही तिथे गंगेवरील अगणित घाट मराठ्यांनी बांधलेले आढळतात.

आपल्याच गौरवशाली आणि विलक्षण कष्टप्रद अवस्थेतील धर्माचे चित्रण, आणि ह्या संकटालाही पुरून उरलेला आपला प्राचीन धर्म ह्याचे यथार्थ विवेचन पुरोगामी, बुद्धीवादी का करत नाहीत असे प्रश्न पडायला लागतात मग. या कादंबरीतील पात्रेही भेटतात आपल्याला सध्याच्याही जगात.

खरे तर ही कादंबरी नाहीच आहे. यात आहे आपला  इतिहास, जो लेखकाने अनेक अभ्यास ग्रंथ वाचून, पारखून घेतला आहे. आणि एक आरसा आहे. आपल्याच समाजाचे प्रतिबिंब दाखवणारा! आणि ह्या दोन्ही गोष्टी सजग, जागरूक वाचकासाठी गरजेच्या आहेत.

 

स्नेहा केतकर

Monday 3 May 2021

कारवाँ, सराई आणि हमाम

 

इराण मध्ये आल्यापासून हे तिन्ही शब्द सतत कानांवर पडतात. पहिले दोन शब्द हे इथे एकत्रच म्हणतात, म्हणजे 'कॅरॅव्हॅनसराई' असे!!!!

मी लहान असताना, 'कारवाँ' नावाचा एक सिनेमा पाहिला होता.पण मला 'कारवाँ' या शब्दाचा अर्थ तेव्हा कळला नव्हता. मग मोठे झाल्यावर, इतर गाणी ऐकताना, काही हिंदी कविता वाचताना, या शब्दाचा अर्थ 'काफिला' किंवा 'तांडा' आहे, असे समजले. मुख्यत्त्वे हा शब्द उंटाच्या समूहाला उद्देशून वापरतात हे कळले.

'सराई' या शब्दाचा अर्थ धर्मशाळा असा आहे, हे हिंदी/मराठी धडे, कविता वाचताना कळले. वाटसरुंचे रात्री मुक्काम करण्याचे ठिकाण म्हणजे सराई. पूर्वी भारतातही लोक मजल-दरमजल करीत चालत वा घोड्यांवरून प्रवास करीत असत. त्याकाळी रात्री उतरण्याकरिता या सरायांचा वापर होत असे. अनेक सरदार, मोठे श्रीमंत लोक अशा सराया बांधत असत.

'हमाम' या नावाचा एक साबण आमच्या लहानपणी होता. पण या शब्दाचा अर्थ काय याचा मी कधी विचारच केला नव्हता. पण मध्यपूर्वेत फिरताना हे दोन्ही शब्द कानांवर पडतात आणि या दोन्ही जागा वारंवार पाहायला मिळतात.

'इस्फाहान' या इराणमधील सुंदर शहरात गेलो असताना, एक अतिशय देखणी कॅरॅव्हॅनसराई पाहिली. आज या ठिकाणी इराण मधले सगळ्यात जुने व सगळ्यात सुंदर हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव 'हॉटेल अब्बासी' असे आहे. हे जवळ जवळ ४०० वर्षे जुने हॉटेल आहे. सफाव्हिद राजांच्या काळात म्हणजे पंधराव्या शतकात 'इस्फाहान' शहरात पर्शियाची राजधानी होती. साहजिकच अनेक व्यापारी या शहरात येत असत. इराणमध्ये ५०% हून अधिक भाग डोंगराळ आहे आणि २५% भागात वाळवंट आहे. या भागात पूर्वी प्रवास उंटावरूनच व्हायचा. या व्यापाऱ्यांसाठी बांधलेली ही देखणी सराई! मध्यभागी मोकळी जागा आणि चारी बाजूंनी देखण्या ओवऱ्या! या ओवऱ्यांत व्यापारी रहात असत आणि मधल्या भागांत उंट बांधत असत.


सध्याचे हॉटेल अब्बासी पण खरे तर इस्फाहान मधील ४०० वर्षे जुनी देखणी कॅराव्हानसराई

 

इस्फाहानमध्ये 'हमाम' ही आहेत. अधिक खोलात जाऊन वाचले असता समजले की, काशगर ते इस्तंबूल हा जुना सिल्क रूट आहे. या रूटवरील मुख्य रहदारी उंटांमार्फतच चालायची. तब्रिझला गेलो असताना, कापादोकीयाला गेलो असतानाही अशा सुरेख कॅरॅव्हानसराया पाहिल्या. उंट एका दिवसांत साधारण ४० किलोमीटर चालू शकतात, त्यामुळेच दर ४० किलोमीटरवर या सराया बांधलेल्या आहेत. जनावरांना बांधण्यासाठी छप्पर असलेल्या मोठ्या सराया ह्या रूटवर आहेत.

 

इतिहासाचा मागोवा घेण्याचा हा प्रवास मनोरंजक वाटला. ह्या डोंगराळ, वाळवंटी, खडतर अशा भागातून व्यापार करणाऱ्या त्या धाडसी मुशाफिरांचेही कौतुकच वाटले. या सिल्क रूटवर 'हमाम'ही आढळतात. शिराझ, इस्फाहान, तब्रिझ, मग तुर्कस्तान या सर्व ठिकाणचे 'हमाम' पाहण्यासारखे आहेत. हे 'हमाम' म्हणजे फक्त आंघोळीची जागा ह्यापुरते मर्यादित नाहीत. इथे गरम पाणी, मालिश, पाण्यात सुवासिक अत्तरे टाकण्याची सोय...अशा सर्व सोयी आहेत. काही हौद अनेकांसाठी तर काही काही फक्त एकाच माणसासाठी अशी रचना आहे. छोट्या मोठ्या अनेक खोल्या असतात. बाहेर ओवऱ्या असतात.

कॅरॅव्हॅनसरायांचा उद्देश समजला. पण हे देखणे हमाम कशासाठी बांधले? असा प्रश्न पडला. या विचारात असतानाच आम्ही समोरच असलेल्या अरास नदीपाशी गेलो. इथल्या नद्या ओढ्यासारख्या असतात. आपण हिमालयातील उगमापाशी नदी बघतो ना तशीच साधारण इथली जमिनीवरची नदी असते. भारतासारखी नदीत सूर मारून पोहणारी मुले इथे दिसणे अशक्य. कारण तशी मोठी नदीच नाही ह्या सिल्क रूटवर. मध्य आशियात सगळं भाग डोंगराळ आणि रेताड आहे. प्रवास करताना खुरटी झुडपे तेवढी नजरेस पडतात. पण हिरवा रंग औषधालाही दिसत नाही. सतत बाहेर पाहिल्यावर डोळेही थकतात.


जोल्फा ह्या इराण मधील अझरबैजान सरहद्दीलगतचा खोराश पास येथील देखणा हमाम

 

बाहेर बघता बघता, मी डोळ्यांपुढे ३००/४०० वर्षांपूर्वीचा उंटांचा तांडा आणला. डोंगराळ भागातून उन्हात/थंडीत प्रवास करणारे व्यापारी आणले. अशा वाळवंटी भागातून चालताना चालताना ते किती थकत असतील हे जाणवले. आणि मग 'हमाम' ह्या हवेलीसारख्या वास्तुचे महत्त्व उमगले. हे हमाम त्या व्यापाऱ्यांना ताजेतवाने करत असतील. आज आपण या वास्तुकडे एक प्राचीन वास्तु म्हणून पाहत असलो तरी या ठिकाणीच त्या काळात ह्या थकल्या-भागल्या व्यापाऱ्यांना, तांड्यातील मजुरांना विसावा मिळत असणार हे नक्की!


अरास नदी - नदीपलीकडे अझरबैजान आहे.

भटकंती करत असताना, एक हात इतिहासाच्या हातात असेल, तर प्रत्येक वास्तूशी आपण एक माणूस म्हणून भावनिक संबंध जोडू शकतो.इराण, इस्तंबूल येथे फिरताना म्हणूनच मला या 'कॅरॅव्हॅनसराई' आणि 'हमाम' ह्या जागांचे आकर्षण वाटले. वास्तुकलेवर प्रेम करणारे वेगळ्या दृष्टीकोनातून य जागांकडे पाहतील. मला मात्र त्यातून माणसाची विजीगिषु वृत्ती दिसते. अनेक अडचणींवर मात करत व्यापार उदीम करणारा मानव दिसतो. नुसता व्यापारच नाही, तर नविन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारा, त्यासाठी अपार कष्ट, धोके अंगावर घेणारा माणूस दिसतो.

आजच्या काळात सुखाने मोटारीतून फिरताना, त्या काळी चीनमधून इस्तंबूलपर्यंत व्यापार करणारे उंटांचे तांडे डोळ्यांसमोर येतात. बरोबरच्या वस्तूंसोबत उंटांचीही काळजी करणारे व्यापारी दिसतात. खडतर रस्ता, थकवणारे हवामान आणि यांवर मात करणारे हे भगीरथाचे पुत्र! गंगा नही पण आपल्या देशासाठी गंगाजळी आणणारे!

स्नेहा केतकर

Monday 7 September 2020

मोठी तिची सावली - The other pair

 

ह्या शीर्षकांतर्गत मी मला काही आवडलेल्या short फिल्म्स ची माहिती देणार आहे. साधारणपणे सिनेसृष्टीत लांबीने मोठ्या असलेल्या सिनेमाला, चित्रपटाला अधिक मान आहे  आणि ते साहजिकही आहे. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता-अभिनेत्री असा सगळा उत्कृष्ट संच जमला की तो सिनेमाही अजरामर होतो. लघुचित्र किंवा short फिल्म ही आकाराने लहान असते. दिग्दर्शक, लेखकाला यातून एक विचार मांडायचा असतो. ह्यातील विचार लहान असतो असे नाही, पण तो कमी वेळात मांडलेला असतो हे ही तितकेच खरे.ह्या लहान चित्रपटातही चित्रपटाच्या सर्व अंगांना तितकेच महत्व असते आणि म्हणूनच असे छोटे चित्रपटही कायम स्मरणात राहतात.

The other pair


एक साधारण पाच मिनिटांची फिल्म पाहिली. ह्या चित्रपटात संवाद नाहीत. एक रेल्वे स्टेशन. त्या स्टेशनवर खांद्याला झोळी अडकवून एक ८/१० वर्षांचा मुलगा फिरतोय. स्टेशनवरचा कचराच गोळा करतोय. इतक्यात त्याची जीर्ण-शीर्ण झालेली चप्पल तुटते. ती ठीक करण्याचा तो निष्फळ पयत्न करतो. पण ती दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलेली आहे हे लक्षात येताच निराश होतो. 

इतक्यात कॅमेर्यात सुंदर बूट दिसतात. त्याच्याच वयाचा एक मुलगा मोठ्या ऐटीत हे बूट घालून स्टेशनवर येतो. ह्या स्टेशनवरील लहान मुलाच्याही डोळ्यात हे बूट भरतात. तो आसुसल्या नजरेने बुटांकडे पाहतो. इतक्यात गाडी येते आणि एकाच गडबड उडते. 

घाईघाईत गाडीत चढताना त्या मुलाचा सुंदर बूट स्टेशनवरच पडतो. गाडी चालूच होणार असते. स्टेशनवरचा मुलगा एकवार बुटांकडे बघतो, पण लागलीच बूट उचलून त्या गाडीतील मुलाला द्यायला धावतो. गाडीतील मुलगा हात लांब करून बूट घ्यायचा प्रयत्न करतो. पण गाडी हळु हळु वेग घेते. स्टेशनवरचा मुलं जीव खाऊन धावत असतो. पण एकाक्षणी त्याला कळते की आता आपण त्या मुलापर्यंत पोचू शकणार नाही. तरीही तो धावता धावता गाडीतील मुलाच्या दिशेने बूट फेकतो. पण तो बूट शेवटी स्टेशनवरच पडतो. 

स्टेशनवरचा मुलगा आणि गाडीतील मुलगा खिन्न होतात. आपणही खरेतर खिन्न होतो. कोणालाच ते बूट मिळणार नाहीत असे वाटत असतानाच गाडीतला मुलगा एका सेकंदात स्वतःच्या पायातला बूट काढून स्टेशनवरील मुलाकडे फेकतो. आता हा स्टेशनवरील मुलगा धावत जाऊन ते दोन्ही बूट हातात घेतो. दोन्ही मुलांच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर आनंद! दोघेही एकमेकांकडे बघून खुशीने हात हलवतात आणि फिल्म संपते.

आपण अक्षरशः अवाक झालेलो असतो. हा शेवट आपण कल्पिलेला नसतो. तो लाडाकोडात वाढलेला मुलगा आपला बूट ह्या गरीब मुलाला देईल असे आपल्याला अजिबात वाटत नाही. आणि सुरवातीलाही तो स्टेशनवरचा मुलगा बहुतेक त्या बुटाच्या मोहात पडून तो बूट स्वतःकडेच ठेवेल असे वाटते आपल्याला. आपल्यातली निरागसता कशी आणि किती लोपली आहे हे आपलं आपल्यालाच कळतं! त्या लहान मुलांच्या निरागसतेचा स्पर्श आपल्यालाही होतो. केवळ दृश्य माध्यमातून साधलेला हा परिणाम आपल्याला हलवून टाकतो.

आपण मोठे होत असताना आपल्यातील निरागसता कशी लोप पावली आहे हे प्रकर्षाने जाणवून देणारा हा चित्रपट. रुमालाने बूट पुसणारा तो श्रीमंत घरातील मुलगा आढ्यतेखोरच असणार असे आपणच ठरवतो. आणि स्टेशनवरील मुलगा ह्या सुरेख बुटाच्या मोहात पडून तो बूट ढापणार असंही आपणच ठरवतो. आपल्या ह्या प्रत्येक गृहितकाला त्या मुलांचा निरागसपणा छेद देतो. म्हणूनच सिनेमात कोणत्याही मोठ्या माणसावर focus नाही. दोन लहान मुले आणि तो बूट ह्यावरच कॅमेरा आहे.

ह्या चित्रपटाच्या तांत्रिक बाबींबद्दल काही मी बोलू शकणार नाही. कारण तेवढा ह्या माध्यमाच्या तंत्राचा माझा अभ्यास नाही. पण मनाला हा छोटा चित्रपट अगदी भिडतो. आणि म्हणूच स्मरणात राहतो.

स्नेहा केतकर.

The other pair

This Egyptian Short Film is Based On A Situation Of Ghandi's Life. Directed by : ٍSarah Rozik Screenplay : Mohammed Maher D.O.P : Haitham Nasser Edited by : Eman Samir Sound Engineer & Music : Mohamed Hassan Elhanafy Art Director : Hassan Elplisy Production Manger: Yasser Elfishawy Actors : Ali Rozik & Omar Rozik

 

Tuesday 10 October 2017

अहिल्या !

कोण होती अहिल्या ? पंचकन्यापैकी एक. ब्रह्माची निर्मिती. एक अप्रतिम सौंदर्यवती. गौतम ऋषींची पत्नी. एक पतिव्रता स्त्री! पण तिच्या सौंदर्यावर इंद्रदेव भाळले आणि त्याचा दोषही तिलाच लागला. अहिल्येच्या या गोष्टीत सगळीकडे पुरूषच आहेत. ब्रह्माने तिला निर्माण केली. या आपल्या कन्येसाठी गौतम ऋषी हेच योग्य वर आहेत, असे वाटून अहिल्येचे तिच्याहून वयाने खूप मोठ्या असणारया या तपस्व्याशी ब्रह्माने लग्न लावून दिले. या ऋषींनी, आपल्या या सौन्दर्यवती पत्नीच्या सौंदर्याला एक पुरुष म्हणून, पती म्हणून न्याय दिला असेल? कल्पना नाही. या सौन्दर्यवतीवर इंद्रदेव मोहित झाले. ही सगळी गोष्ट आपल्याला माहित आहेच.

पण आज ही गोष्ट आठवण्याचे कारण? सुजॉय घोष या बंगाली दिग्दर्शकाची ' अहिल्या' नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. चौदा मिनिटांची छोटीशी फिल्म ! पण खूप विचार करायला लावते. याही सिनेमात एक सुंदर स्त्री आहे. तिचा वयस्कर नवरा आहे. त्याचे नाव गौतम साधू ! आणि इंद्र सेन नावाचा एक पोलीस अधिकारीही आहे. नायिकेचे नाव अहिल्या आहे .फिल्मचे नावही अहिल्या आहे.

इंद्र सेन हा पोलीस अधिकारी एका अर्जुन नावाच्या बेपत्ता झालेल्या माणसाच्या शोधार्थ गौतम साधू या कलाकाराच्या घरी येतो. तिथे त्याला अर्जुनसारखीच दिसणारी एक छोटी बाहुली दिसते. तशा तिथे अजून पाच-सहा बाहुल्याही दिसतात. सर्व बाहुल्या या पुरुषांच्याच असतात. या सर्व कलाकृतींचे / बाहुल्यांचे श्रेय गौतम साधू आपल्या पत्नीला देतात. असं का? हे फिल्म पाहिल्यावरच समजेल सर्वांना.

ही फिल्म पाहून अनेकांच्या मनात अनेक विचार आले असणार. मला मात्र ही फिल्म पाहून अहिल्येला काव्यात्म न्याय मिळाला असे वाटले. अहिल्येचे दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषींनी तिला दिला. खरे तर, इंद्राचे मन अहिल्येकडे आकृष्ट झाले होते. तिच्या कडून नकळत चूक झाली होती. पण दगडात रुपांतर मात्र अहिल्येचे होते. ती पावन होते ती देखील रामाच्या पदस्पर्शाने! या फिल्ममध्ये मात्र  नायिकेवर आकृष्ट होऊन तिला भोगणाऱ्या सर्व पुरुषांची बाहुली बनते. आणि याला उ:शाप नाही.

अहिल्येच्या पुराणातल्या गोष्टीत 'अहिल्या' आहे, ती फक्त नावाने! एक जिवंत, हाडामांसाची स्त्री म्हणून ती कुठेच दिसत नाही. तिला दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषी देतात. पण मुळात तिच्या असण्याचा, तिच्या भावभावनांचा ते कधी विचार करतात का? रामाच्या पदस्पर्शाने ती पावन होते, म्हणजे परत जिवंत होते. पण पुढे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुराणातून मिळत नाहीतच.

' अहिल्या' या शॉर्ट फिल्ममध्ये मात्र बाहुली झालेले पुरुष पाहून आजच्या काही अंशी बदलत्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडते. फिल्म एका पुरुषानेच लिहिली व दिग्दर्शित केली आहे हे विशेष!

पुराणातल्या पंचकन्यांना देवत्वाची उपाधि देऊन एका बाहुलीत त्यांचे रुपांतर केले आहे. पण आजच्या अहिल्येला तरी एक हाडामांसाची जिवंत स्त्री म्हणून जगता यावे अशी आशा करायला हरकत नसावी. अहिल्या, गौतम, इंद्र, पुरुषी मानसिकता, स्त्रीची लैंगिकता याचा पुनर्विचार या चौदा मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममुळे झाला, हे ही नसे थोडके!!! 
                             
असे म्हणतात, की कलाकृती आस्वादकाच्या नजरेतून खुलते. कलाकृती ही एखाद्या लोलकासारखी असते. प्रत्येकाला त्यातून नवे काही सापडू शकते. सगळयांनी ही फिल्म पाहून जरूर तुमची मते कळवा. बघू तुम्हांला काय जाणवते.

https://www.youtube.com/watch?v=m-mjkgBgStc


स्नेहा केतकर